महत्वाच्या बातम्या

 शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर उलटल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील मौशी गावात शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार, १० जुलै रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मौशी गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव विवेक जीवन कोडाप ३० वर्षे, रा. मौशी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवेक कोडाप हे स्वतःच्या शेतात ट्रॅक्टर क्र. एमएच-३५ एजी-७९५८ च्या साहाय्याने नांगरणीचे काम करत होते. नांगरणीदरम्यान ट्रॅक्टर चिखलात अडकल्याने तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरला लाकडी ओंडका लावून प्रयत्न केला.

मात्र, ट्रॅक्टर बाहेर काढत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि ट्रॅक्टर उलटला. या अपघातात विवेक कोडाप ट्रॅक्टरखाली दबले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

या दुर्दैवी घटनेमुळे कोडाप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कुरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos