नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर रामनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तब्बल नऊ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेला महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी, जो गुन्हा दाखल झाला तेव्हा विधीसंघर्षित बालक होता, त्याला अखेर रामनगर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
गडचिरोली पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संत्रा मनोज मालाकार उर्फ अंकित मनोज मालाकार (सध्या वय २२ वर्षे), रा. बल्लारशाह रोड, चंद्रपूर हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विधीसंघर्षित बालक होता. महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप असून, तो रिमांड होममधून पळून गेल्यानंतर त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा सातत्याने शोध घेण्यात येत होता. गडचिरोली पोलिसांचे शोध पथक विविध ठिकाणी तपास करत होते, मात्र आरोपीचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी स्वतः या तपासाची सूत्रे हाती घेतली. गेल्या वर्षभरात त्यांनी विशेष पथक तयार करून चंद्रपूरसह विविध भागांत आरोपीचा शोध सुरू ठेवला.
दरम्यान, रामनगर पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांना आरोपीबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. ७ जुलै २०२६ रोजी संत्रा मालाकार हा एका अंत्यविधीसाठी आल्याची माहिती मिळाली. तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने त्याला संत्रा या नावाने हाक मारल्याचे तसेच त्याच्या हातावर संत्रा असे गोंदलेले नाव दिसल्याचे खबऱ्याच्या निदर्शनास आले. ही माहिती तत्काळ रामनगर पोलिसांना देण्यात आली.
माहितीची खातरजमा करून रामनगर व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करत तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे आणि पोलीस हवालदार आनंद खरात यांनी विशेष भूमिका बजावली.
News - Chandrapur




Petrol Price




