महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीच्या बांधकामाला मोठा खोळंबा : कंत्राटदाराच्या कारभारावर मजुरांचे गंभीर आरोप


- तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची तक्रार; उपकंत्राटदार व मजूर साईट सोडून परतण्याच्या मार्गावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीच्या बांधकामाला सध्या मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता बांधकामातील कथित अनियमितता, कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि मजुरांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नामुळे काम ठप्प होण्याच्या मार्गावर आले आहे. दरम्यान, कामावर असलेले मजूर आणि उपकंत्राटदारांनी साईट सोडून परत जाण्यास सुरुवात केल्याने या महामार्गाच्या कामाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

या भागातील रस्ता बांधकामासाठी तयार करण्यात आलेले डायव्हर्जन काही दिवसांपूर्वी वाहून गेले. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून, वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाकडून अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्य कंत्राटदार आणि मजूर तसेच पेटी कंत्राटदार यांच्यात विविध कारणांवरून वाद निर्माण झाले आहेत. परिणामी अनेक मजूर व उपकंत्राटदार आपले साहित्य घेऊन साईट सोडून परत जात असल्याचे चित्र आहे.

मजुरांकडून कंत्राटदारावर गंभीर आरोप -
या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी आणि उपकंत्राटदारांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली असून, कंत्राटदाराच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केले आहेत. मजुरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. वारंवार पैसे मागूनही कंत्राटदाराकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. फोन करूनही कंत्राटदार फोन उचलत नसल्याचा किंवा पेमेंट देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, कंत्राटदाराकडून कोणतेही स्पष्ट कारण न देता स्वतःच्या पद्धतीने हिशोब करण्यात येत असून, पेमेंटमधून मनमानी कपात केली जात असल्याचा आरोपही मजुरांनी केला आहे. कामाचा मोबदला मागितल्यास काम करायचे असेल तर करा, नाहीतर निघून जा, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही मजुरांनी सांगितले.

बिल आणि वर्क ऑर्डरबाबतही प्रश्न उपस्थित -
या कामाच्या प्रशासकीय प्रक्रियेवरही मजूर आणि उपकंत्राटदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आजपर्यंत कोणत्याही कामाचे बिल प्रमाणित (Bill Certify) करण्यात आले नसल्याचा तसेच वर्क ऑर्डरही अद्याप प्रमाणित करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

४५ मजुरांचे कुटुंबीय संकटात -
सुमारे ४५ मजुरांच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, वेळेवर वेतन मिळत नसल्याने मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही आमची मेहनतीची कमाई मिळवण्यासाठी आता ही साईट सोडून परत जात आहोत. जिथे आमच्या कष्टाचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळत नाही, तिथे काम करणे कठीण आहे, असे मजुरांनी स्पष्ट केले.

या सर्व प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीचे बांधकाम रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून, वरिष्ठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, मजुरांचे थकीत वेतन मिळवून द्यावे आणि रखडलेले काम सुरळीत सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos