बनावट नियुक्ती आदेश देऊन नोकरीच्या नावाखाली फसवणूक : युवकाला अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत उमेदवारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. राकेश मुनगेलवार (रा. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राकेश मुनगेलवार याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) मध्ये शिपाई पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष अनेक बेरोजगार युवक-युवतींना दाखवले. नोकरीची खात्री देत त्याने उमेदवारांकडून तसेच त्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची उकळपट्टी केल्याचे समोर आले आहे.
आरोपी विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींच्या पालकांना लक्ष्य करत होता. विश्वास संपादन करून त्यांच्याकडून मोठी रक्कम स्वीकारल्यानंतर तो संबंधित उमेदवारांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे असल्याचा भास निर्माण करणारे बनावट नियुक्ती आदेश देत असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कालावधीत आरोपीकडून फसवणुकीची व्याप्ती, किती उमेदवारांची फसवणूक झाली, किती रकमेची उकळपट्टी करण्यात आली आणि या रॅकेटमध्ये अन्य कोणी सहभागी आहे का, याबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, सरकारी नोकरीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता संबंधित भरती प्रक्रिया केवळ अधिकृत माध्यमांतूनच तपासून पाहावी, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा बनावट नियुक्तीपत्रांबाबत तातडीने पोलिस अथवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




