ग्यारापत्ती आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


- बैलबंडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक : पाठ्यपुस्तक वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कोरची तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ग्यारापत्ती येथे मंगळवारी ३० जून प्रवेशोत्सव व पालक मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच पालकांचा शाळेशी संवाद वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरलेली सजविलेल्या बैलबंडीतून काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची मिरवणूक होती. या मिरवणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रघुनाथ आचला यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रिजलाल आचला होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, सामाजिक कार्यकर्ते मुकेश नरोटे, राजेश नैताम, डॉ. कीर्ती धनकर तसेच नागपूर प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही. डी. मडावी यांनी केले. संचालन वाय. एस. पुसाम यांनी केले तर आभार प्रदर्शन पी. आर. गोवर्धन यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य केले.
News - Gadchiroli




Petrol Price




