महत्वाच्या बातम्या

 रेती तस्करीच्या मृत्यू घाटावर प्रशासन गप्प : शिवसेनेची आक्रमक भूमिका


- अवैध उत्खननामुळे मजुरांचा बळी

- जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात प्रशासकीय आदेशानुसार ९ जून २०२६ पासून सर्व रेतीघाट अधिकृतरीत्या बंद करण्यात आले आहेत. मात्र, कागदावर घाट बंद असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन, साठेबाजी आणि वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारामागे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री, स्थानिक आमदार आणि रेती माफिया यांचे संगनमत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केला आहे.

सोमवारी २९ जून कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवन गेडाम यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील रेतीघाटांवर सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांत दोन निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, कोंडाळा येथील सिनराई रेती घाटावर नियमाबाह्य पद्धतीने मोठ्या लोडर यंत्रांच्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना एका मजुराचा बळी गेला. दुर्दैवी बाब म्हणजे, घाटमालक या मृत्यूंची आर्थिक किंमत लावून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. या मृत्यूनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संशयास्पद हालचालींमुळे शवविच्छेदन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केवळ तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे, असे सांगत गेडाम यांनी थेट जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रशासनाच्या डोळ्यांदेखत ओव्हरलोड ट्रॅक्टर आणि मोठी वाहने शहरातून जात असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. जर जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांना ही लूट थांबवता येत नसेल, तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत.

या अवैध व्यवहाराची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) ने केली आहे. पवन गेडाम यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक पूर्णपणे बंद न झाल्यास, शिवसेना आपल्या लोकशक्तीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करेल.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला पवन गेडाम यांच्यासह डॉ. श्रीकांत बनसोड (सह संपर्कप्रमुख, जिल्हा गडचिरोली), नंदू कुमरे (विधानसभा संघटक), विलास ठोंबरे (माजी जिल्हा संघटक), मनोज कोरडे (तालुकाप्रमुख, चामोर्शी), विलास गावडे (तालुकाप्रमुख, वडसा), गोविंदा ब्राह्मणवाडे (तालुकाप्रमुख, गडचिरोली), पप्पू शेख (शहर प्रमुख, गडचिरोली), वैभव सातपुते (युवा सेना प्रमुख), अतुल नेताम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos