महत्वाच्या बातम्या

 वर्धा ते शेगाव-शिर्डीसाठी नवीन बससेवेचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ


- ग्रामीण भागातील नागरिकांना शहरासोबत जोडण्याचे महत्वपूर्ण काम एसटी महामंडळाचे -पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

- नवीन पाच राजमाता जिजाऊ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील साईभक्त आणि गजानन महाराज भक्तांच्या सोयीसाठी वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी या मार्गांवर स्वतंत्र नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते झाला. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना शहर आणि तालुक्यांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम एसटी महामंडळ करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी केले. 

वर्धा येथील मुख्य बसस्थानकामध्ये वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी नवीन बससेवेचा शुभांरभ व राजमाता जिजाऊ बस लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर बोलत होते. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विभाग नियंत्रक भगवान जगनोर, साई सेवा मंडळाचे विश्वस्त डॉ.विजय बोबडे, सयाजी महाराज, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, यंत्र अभियंता प्रताप राठोड, विभागीय लेखा अधिकारी गायगोवाड, आगार व्यवस्थापक युधिष्ठिर रामचवरे, विभागीय भंडाराधिकारी करुणा वानखेडे, विभागीय वाहतूक अधीक्षक उजवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साईभक्त आणि गजानन महाराजांचे भक्त आहेत. दरवर्षी हजारो भाविक शेगाव आणि शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात. भाविकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बससेवेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेत ही सेवा उपलब्ध करून दिली, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. 

मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असणाऱ्या वर्धा बसस्थानकाचे तसेच सेलू येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या बसेसच्या जागी नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच नवीन राजमाता जिजाऊ बस वर्धा आगारात दाखल झाल्या आहेत. या बस पर्यावरणपूरक असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. 

जिल्ह्यातील नागरिक व वयोवृध्दांना संताचे दर्शन करण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी आभार मानले. नागरिकांनी शेगाव-शिर्डी बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. विजय बोबडे, सयाजी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात साई सेवा मंडळाच्यावतीने चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तीन पदके पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविणाऱ्या ईशिता रहाटे चा पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos