महत्वाच्या बातम्या

 कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची अवैध वाहतूक उघड : गडचांदूर पोलिसांनी १२ गोवंशाची केली सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचांदूर पोलिसांनी गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या १२ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गडचांदूर पोलिसांनी मौजा आसन बसस्टॉप परिसरात नाकाबंदी करून संशयित महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप क्रं. एमएच-३२-एजे-६४७१ अडवून त्याची तपासणी केली.

वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये १२ जिवंत गाई अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. वाहनातील व्यक्तीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच जनावरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही.

यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी घेऊन जात असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २ लाख ४० हजार रुपये किंमतीची १२ गोवंश जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. अशा प्रकारे एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात संतोष रामाजी परचाके (वय ३५), रा. कळंब हळदीपुरा, ता. जि. यवतमाळ याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी असलेला वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव गोदे, पोलीस अंमलदार बलवंत शर्मा, सुरज, प्रकाश आणि साईनाथ यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos