मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६

- बीएलओ मार्फत घरोघरी तपासणी ३० जूनपासून सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या माध्यमातून घराघर भेटी घेऊन मतदारांची माहिती तपासणी आणि पडताळणी केली जाणार आहे.
बीएलओ गृहभेटींचा कालावधी जाहीर -
या विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओंच्या गृहभेटी ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत होणार आहेत. या दरम्यान मतदारांच्या नोंदींची तपासणी, आवश्यक दुरुस्ती आणि माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
गृहभेटीपूर्वी मतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना -
गृहभेटी सुलभ आणि जलद होण्यासाठी नागरिकांनी शक्य असल्यास खालील माहिती आधीच तयार ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे:
- मागील SIR मधील स्वतःचा किंवा आई-वडिलांचा तपशील
- नाव
- मतदारसंघ
- यादी भाग क्रमांक (Part Number)
- अनुक्रमांक (Serial Number)
ही माहिती खालील माध्यमातून शोधता येऊ शकते -
- अधिकृत संकेतस्थळ : voters.eci.gov.in
- ECINet App
बीएलओ भेटीदरम्यान प्रक्रिया कशी असेल -
बीएलओ घरी आल्यानंतर मतदारांनी :- दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती अचूकपणे भरावी
- अर्जावर स्वाक्षरी करावी
- भरलेली एक प्रत बीएलओकडे जमा करावी
- त्याबदल्यात पोच (Acknowledgement) घेऊन दुसरी प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी
ही प्रक्रिया मतदार नोंदणी व पडताळणी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी महत्त्वाची आहे.
नाव नोंद नसल्यास आवश्यक कागदपत्रे -
जर मतदाराचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये नोंदलेले नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक वैध कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे: १.जन्म दाखला, २.पासपोर्ट, ३.इयत्ता १० वी (मॅट्रिक) किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, ४.रहिवासी प्रमाणपत्र, ५.जात प्रमाणपत्र, ६.सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी/निवृत्तीवेतन ओळखपत्र, ७.राज्य किंवा स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, ८.शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, ९.वन हक्क प्रमाणपत्र, १०.राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, ११.बँक, टपाल कार्यालय, जीवन विमा महामंडळ किंवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र/प्रमाणपत्र यासोबतच आधार कार्ड हे ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाचे आवाहन -
ही मोहीम मतदार यादी अधिक विश्वासार्ह, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबवली जात आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी बीएलओला सहकार्य करून आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




