आरमोरीत अवैध दारूची तस्करी करणारी कार पकडली : ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपी गजाआड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक पोलीस स्टेशनच्या पथकाने ब्रह्मपुरी रोडकडून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एका संशयित कारची नाकाबंदी करून झडती घेतली असता, कारमधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक केला जाणारा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत ५ लाख २० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (१२ जून) जुन्या बस स्टँड परिसराजवळ करण्यात आली. प्रफुल प्रकाश घरटे (वय ३२, रा. हनुमान नगर, ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलिसांना ब्रह्मपुरी मार्गार्गे गडचिरोलीकडे कारमधून अवैध दारूची मोठी खेप जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जुन्या बस स्टँडपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर पश्चिमेस दोन पंचांसमक्ष सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान, ब्रह्मपुरीकडून गडचिरोलीच्या देशाने जाणारी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-४०/Y-६१४९) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती थांबवली. कारची कसून तपासणी केली असता, त्यात पोलिसांना विदेशी दारू आणि बिअरचे बॉक्स आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी ३६,००० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर प्रीमियम स्ट्राँग बिअरचे ५ बॉक्स (एकूण १२० टीन), ८४,००० रुपये किमतीचे रॉयल स्टॅग विदेशी मद्याचे ५ बॉक्स (एकूण २४० निपा) आणि ४,००,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी प्रफुल घरटे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन आरमोरी येथे अप. क्र. २१९/२०२६, कलम ६५(अ), ९८(२) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
सदर यशस्वी कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस हवादार रजनीकांत पिल्लेवान, पोहवा वालदे, चालक पोलीस नाईक विस्कडे, पोलीस शिपाई सराटे आणि सुरेश झाडे यांनी केली.
News - Gadchiroli




Petrol Price




