शेतकऱ्यांनी कापुस उत्पादकता अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, कापूस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कापूस उत्पादकता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली शेती आधुनिक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना क्लोज स्पेर्सिग प्रात्यक्षिकांसाठी १४ हजार रुपये प्रति हेक्टर, सघन कापूस लागवड प्रात्यक्षिकासाठी १८ हजार ५०० प्रतिहेक्टर, एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिकासाठी ७ हजार ५०० प्रति हेक्टर, शेतकरी प्रशिक्षणासाठी ३० शेतकऱ्यांच्या बॅचसाठी १५ हजार रुपये प्रति बॅच, कॉटन श्रेडरसाठी कमाल १ लाख २० रुपये प्रति युनिट अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. लाभ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थामार्फत समुह पध्दतीने दिला जाणार आहे. एका गटात कमाल २५ शेतकरी असू शकतात. महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यांची प्रथम प्राधान्य तत्वावर निवड केली जाईल. लघु व उल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती जमाती तसेच वनहक्कधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वर्धा हा कापूस उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे. कपास क्रांती अभियानाच्या माध्यमातून सघन कापूस लागवड आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे नवे तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. इच्छुक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपला अर्ज व नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




