महत्वाच्या बातम्या

 घरासाठी भाजीपाला घेऊन निघाला, पण घरी पोहोचलाच नाही : अपघातात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आठवडी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परत जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी १३ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास कापणगाव गावाजवळ घडली. विकास देवराव मोरे (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

विकास मोरे हे मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील रहिवासी होते. मागील सहा वर्षांपासून ते राजुरा तालुक्यातील आर्वी येथे सासुरवाडीत वास्तव्यास असून शेती व्यवसाय करीत होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी विकास मोरे यांनी स्वतःची बैलजोडी विकून त्यातून मिळालेली रक्कम कुटुंबीयांकडे सुपूर्द केली होती. त्यानंतर ते राजुरा येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आले होते. सायंकाळी भाजीपाला घेऊन दुचाकीने आर्वीकडे परत जात असताना रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास कापणगाव गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.

धडकेची तीव्रता इतकी होती की विकास मोरे हे दुचाकीसह खाली कोसळून गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत विकास मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व अन्य आप्तस्वकीय असा परिवार आहे. कष्टाळू व मनमिळावू स्वभावामुळे त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे आर्वी व तोहोगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos