अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाविकासआघाडी सराकरने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात एकही नवीन योजना नाही. या अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा का विशिष्ट भागांचा अर्थसंकल्प म्हणायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. एकूणच या अर्थसंकल्पाने साफ निराशा केली, असे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. आजच्या अर्थसंकल्पात प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही मदत देण्यात आली नाही. तसेच मूळ कर्जमाफी योजनेतही ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्यासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. याशिवाय, सोयाबीन, कापूस बोंडअळीग्रस्त शेतकरी आणि पीकविम्यासंदर्भातही शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच वीजबिलासंदर्भातही शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, असा दावाही  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य व्याजदराने कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही योजना संपूर्णपणे फसवी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकरी हे लहान आणि कोरडवाहू शेती करणारे आहेत. या शेतकऱ्यांना ५० हजार ते एक लाखांपर्यंतच कर्ज घेणे झेपते. त्यामुळे या कर्ज योजनेचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकासआघाडी सरकारने कोणत्याही नव्या पायाभूत प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. सरकारने ज्या पायाभूत योजनांसाठी तरतूद केली त्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला त्यावर एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकासआघाडीचे नेते पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. मात्र, आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दरात कोणतीही कपात केलेली नाही. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात १० रुपयांनी महाग पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीच्या नेत्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरांवर बोलण्याचा कोणताही हक्क उरलेला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  Print


News - Rajy | Posted : 2021-03-08


Related Photos