वन पर्यटनाच्या विकास कामांना गती द्या : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- तारेच्या कुंपना ऐवजी बांबू लागवडीवर भर द्या
- तलावातील गाळ शेतकऱ्यांना नेऊ द्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वन पर्यटन विकासाची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करून वन पर्यटनाच्या विकास कामांना कमालीची गती द्या, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. वन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वन पर्यटन विकास, बोर अभायारण्य येथील रिसार्ट व बॉटनीकल गार्डन आराखडा याबाबत आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरवीर सिंग,बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
वन विभागाने पारंपरिक तारेच्या कुंपणाऐवजी निसर्गाला पूरक अशा बांबूच्या फेन्सिंगवर भर दिला पाहिजे. तसेच, आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी च व्यापक वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. सालोड येथील इको पार्कमध्ये वृक्षारोपणासाठी सावंगी येथील शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन एक विशेष मोहीम राबवावी आणि जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील तलाव खोलीकरणाचे काम करताना त्यातून निघणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नेण्याची परवानगी देण्यात यावी. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि तलावांची साठवणूक क्षमताही वाढेल. पावसाचे पाणी अधिकाधिक कसे साचवता येईल, यावर यंत्रणांनी लक्ष केंद्रित करावे. केळझर, सालोड व रोठा येथील विकासकामांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी आमदार राजेश बकाने यांनीही विविध विषय मांडले. सोलाड येथील इको पार्क, सारंगपुरी निसर्ग पर्यटन, गिरड येथील प्रस्तावित टायगर सफारी, सेवाग्राम येथील तलाव खोलीकरण, वन क्षेत्रातील मृद व जलसंधारणची कामे, रहाटी व ढगा पर्यटन गेट, वनातील इमारती वनातील मार्ग व पूल, आदीचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.
बोरधरण येथील रिसॉर्ट व बॉटनीकल गार्डनचा आढावा -
बोर व्याघ्र पर्यटनाला चालना देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिसॉर्ट व बॉटनीकल गार्डन आराखड्याचा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेतला. रिसॉर्ट बुकिंगची सुविधा मुख्य गेटजवळच उपलब्ध असावी. रिसॉर्टच्या देखभाल व दुरुस्तीसाठी व्यावसायिक एजन्सीची नियुक्ती करावी. वन क्षेत्रात आकर्षक मुख्य प्रवेशद्वार आणि सुसज्ज गार्ड रूम तयार करावी. जुन्या रेस्ट हाऊसचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे, आदी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
News - Wardha




Petrol Price




