महत्वाच्या बातम्या

 मुल येथे घरफोडी : सव्वादोन लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल शहरातील एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे २ लाख २७ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रकाश नारायण चिप्पावार (६५), सेवानिवृत्त (कृषी विभाग) हे कुटुंबासह मुल येथे राहतात. ते २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता घराला कुलूप लावून राजुरा येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर ३० एप्रिल रोजी नागपूर येथे वधुवर मेळाव्यासाठी गेले होते. दरम्यान, १ मे रोजी सकाळी शेजारी चेतन गोविंदवार यांनी फोनवर घराचे दार उघडे असल्याची माहिती दिली.

त्यानंतर चिप्पावार हे तातडीने मुल येथे परतले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. पोलिसांच्या उपस्थितीत घरात प्रवेश करून पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरट्यांनी कपाटे उचकून त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात सुमारे २ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२९ एप्रिल ते १ मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या कंपाऊंडवरून आत प्रवेश करून दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी मुल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos