धाबा पोलिसांची तत्पर कारवाई : हरविलेले ७ मोबाईल शोधून मालकांना परत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन धाबा येथील पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत हरविलेले तब्बल ७ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केल्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ ते २०२६ दरम्यान धाबा पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती CEIR पोर्टलच्या माध्यमातून संकलित करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे हे मोबाईल तेलंगाणा, गडचिरोली व चंद्रपूर परिसरातून शोधून काढण्यात आले. सर्व मोबाईल सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन धाबा येथे संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.
परत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये जितेंद्र पेरगुरवार, रितेश सिडाम, अरुणा कावळे, राकेश उईके, शाहू लिंगे, मधुकर डोंगरे व विजय गोहणे या नागरिकांचा समावेश आहे. या ७ मोबाईलची एकूण अंदाजे किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर पोलीस स्टेशन धाबाचे प्रभारी अधिकारी सपोनि. सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पोहवा. विजय मडावी, पोअं धनराज सयाम, श्रावण कुत्तरमारे, गजानन तुरेकर, मासुम मेश्राम, चापोअं रामेश्वर पाल पोअं अमीत गुरनुले, अमोल देठे, प्यारेलाल देव्हारे यांनी केले.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आठवडी बाजार किंवा बसस्थानक परिसरात वावरताना मोबाईल सुरक्षित ठेवा. विशेषतः शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवणे टाळावे, अन्यथा हरविणे किंवा चोरी होण्याची शक्यता अधिक असते. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




