महत्वाच्या बातम्या

 राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५ वा वार्षिकोत्सव साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : केरळमधील कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी देशातील चार भागात बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी व द्वारकापुरी येथे धर्मपीठे निर्माण करून देशाची एकात्मता अखंड राखली. त्यामुळे भारत देश एकसंध ठेवण्यात केरळचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.  

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जानेवारीला केरळ ख्रिश्चन कौन्सिल, मुंबई या संस्थेचा ६५ वा वार्षिकोत्सव तसेच नाताळ व नववर्ष स्वागत समारोह कॅनोसा सभागृह, अंधेरी, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.   

भारतीय भाषा देशाला जोडण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे,असे नमूद करून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला असल्याचे राज्यपालांनी सांगितले. तसेच सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत झाल्यास इतर भाषा शिकणे सुलभ होते, असे सांगून राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यातील सर्व दीक्षांत समारंभ मराठी भाषेतूनच संचलित करण्याचा दंडक घालून दिल्याचे, त्यांनी सांगितले. 

भारताने सर्व धर्मांचा व विभिन्न धर्ममतांचा नेहमीच आदर केला आहे. वादे वादे जायते तत्वबोध ही या देशातील परंपरा आहे. त्यामुळे  धर्म कोणताही असला तरीही भारतीय म्हणून आपण एक झाले पाहिजे. केरळने देशाला पी.टी. उषा सारखी धावपटू दिली आहे, तर महाराष्ट्राला पी.सी. अलेक्झांडर व के शंकरनारायणन यांसारखे उत्तम राज्यपाल दिले आहेत, असे राज्यपालांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष बाबू वर्गिस यांनी संस्थेच्या स्थापनेच्या इतिहासाची तसेच संस्था करीत असलेल्या  सामाजिक, धर्मादाय व सांस्कृतिक कार्याची माहिती दिले. 

राज्यपालांच्या हस्ते ६५ व्या वार्षिक दिन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, गुणवंत विद्यार्थी तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत मराठी तसेच हिंदी भाषेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या केरळी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला लोकप्रिय मल्याळी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते रेंजी पणिकर, केरळ ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाबू वर्गिस, महासचिव सायमन वर्की, निमंत्रक बिनु चंडी, ख्रिस्ती धर्मगुरू परिषदेचे सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते.  





  Print






News - Rajy




Related Photos