राष्ट्रीय लोक अदालतचे ९ मे रोजी आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालत मध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम.अली यांनी केले आहे.
न्यायालयात तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी माध्यम ठरले आहे. यामुळे पक्षकारांना वेळ, खर्च आणि मानसिक त्रास टाळता येतो. दोन्ही पक्षकारातील संबंध सलोख्याचे राहतात. तसेच लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.
न्यायालयात दाखल असलेली सर्व तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, दिवाणी दावे तसेच वाद दाखलपूर्व तडजोड पात्र प्रकरणे येत्या राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्येही ९ मे रोजी सकाळी १० वाजता लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, एनआय ॲक्टची प्रकरणे, भूसंपादन, कौटुंबिक, मोटार वाहन अपघात दावा, एमएसईबीची प्रकरणे, दरखास्त, ग्राहक तक्रार न्याय निवारण प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, न्यायालयातील प्रलंबित बँकेशी संबंधित प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधित, राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद येथील पाणीपट्टीचे प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे.
लोक अदालतीत पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या सहमतीने होते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या न्याय निवाड्याचे, तडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकारांना होते. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात तडजोडीसाठी प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ०७१५२-२४५५९४ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा ८५९१९०३९३२ या मोबाईल क्रमांकावर तसेच तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर व कारंजा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




