ऊर्जामंत्र्यांची नवी घोषणा : थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /नागपूर :
वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत, करोना काळातील देयक माफ, अशा लोकप्रिय घोषणा करून आधीच अडचणीत सापडलेले ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी पुन्हा नागपुरातील पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीवर विचार करू, असे त्यांनी सांगितले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा मी केली होती. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही गठित केली होती. परंतु याच काळात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे समितीची एकही बैठक होऊ शकली नाही. काम थांबल्याने हा प्रस्तावच तयार होऊ शकला नाही. दरम्यान, करोना काळात महावितरणच्या ग्राहकांवरील वीज देयकाची थकबाकी वाढून ७१ हजार कोटींवर गेली. त्यामुळे महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. महानिर्मितीलाही कोळसा खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज यंत्रणेवरील विविध खर्चासाठी प्रचंड त्रास होत आहे. या स्थितीत ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही. त्यामुळे आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर विचार केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-02-19


Related Photos