महत्वाच्या बातम्या

 गोंदिया तालुक्यात हाय व्होल्टेज कामादरम्यान मजुराचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील मौजा पिंडकेपार/गो. परिसरात बुधवारी सकाळी हाय व्होल्टेज वायर जोडणी करत असताना एका मजुराचा विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव सुलतान सूरजलाल टेकाम (वय ३५, रा. शेंडा, ता. सडक अर्जुनी) असून या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यात पॉलिकॅप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी स्थानिक आणि परिसरातील मजूर काम करत आहेत. सुलतानही या कंपनीत काम करणारा मेहनती तरुण होता. बुधवारी सकाळी सुमारे १०:३० वाजता सुलतान वायर बदलण्यासाठी खांबावर चढला. मात्र खांबावरील विद्युत प्रवाह सुरू असल्याचे त्याला लक्षात आले नाही. अचानक विजेचा जोरदार झटका लागल्याने तो खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर -
सुलतान अत्यंत मेहनती आणि कष्टकरी होता. त्याच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे. विशेष म्हणजे सुलतानचा विवाह नुकतेच झालेले होते आणि काही दिवसांत तो बाप होणार होता. दुर्दैवाने आपल्या होणाऱ्या बाळाचे दर्शन घडण्यापूर्वीच त्याने जीव गमावला. शेंडा गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

सुरक्षेचा अभाव आणि ग्रामस्थांचा रोष -
ग्रामस्थांचा आरोप आहे की, कंपन्या मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की - काम करताना मजुरांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली होती का?, विद्युत प्रवाह सुरू असताना मजुराला खांबावर चढण्याची परवानगी कशी देण्यात आली?, घटनेच्या वेळी कंपनीचे सुपरवायझर उपस्थित होते का?

गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच एका गरिबाचा बळी गेला आहे. त्यांनी कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos