महत्वाच्या बातम्या

 सत्र २०२६-२०२७ साठी इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयामार्फत इयत्ता ११ वीच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत नोंदणी करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी (Student Registration) करणे आवश्यक असून त्यानंतर अर्जाचा भाग-१ भरून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक राहील. त्यानंतर भाग-२ (Option Form) मध्ये पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करून प्रवेशासाठी अर्ज सादर करावा लागेल.

प्रवेश प्रक्रिया ही गुणांनुसार व आरक्षणाच्या नियमानुसार पार पाडली जाणार आहे. प्रवेशासाठी CAP Seats, In-House Quota, Management Quota तसेच Minority Quota यानुसार जागांचे वाटप करण्यात येईल. तसेच एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस इत्यादी प्रवर्गासाठी शासनाने निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार आरक्षण लागू राहील. समांतर आरक्षणांतर्गत दिव्यांग, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक कुटुंबीय तसेच इतर विशेष प्रवर्गासाठीही तरतूद करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये इ. १० वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश असून सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील. प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालय वाटप ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जाईल. ज्यांना प्रवेश मिळेल त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळणार नाही, त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी उपलब्ध राहील.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व संबंधितांनी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, वर्धा यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos