महत्वाच्या बातम्या

 जागतिक महिला दिनी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


- किशोरवयीन मुलींना लसीकरण करण्याचे आवाहन

- गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला लसीकरण उपाय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला वेळीच आळा घालण्यासाठी व महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून लस आपल्या लेकीची, सुरक्षा तिच्या भविष्याची या मोहिमेअंतर्गत एचपीव्ही लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या हस्ते महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला आहे.

लसीकरण मोहिमे दरम्यान १४ वर्ष पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्ष पुर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणाचा किशोरवयीन मुलींनी लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

लसीकरणाचे महत्व आणि फायदे -

गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. एचपीव्ही लस या आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असून ९० टक्क्यांहून अधिक संरक्षण प्रदान करते. ही लस सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पुर्णपणे मोफत उपलब्ध आहे. ही लस जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित असून पुर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणानंतर काही मुलींना सौम्य ताप किंवा इंजेक्शनच्या जागी सूज येऊ शकते, जी २ ते ३ दिवसांत बरी होते.

लसीकरणासाठी पात्रता आणि नोंदणी -

ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पुर्ण केली आहेत परंतु १५ वर्ष पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुली लसीकरणास पात्र आहेत. लसीकरणासाठी पालकांनी आपल्या मुलींची नोंदणी केंद्र सरकारच्या U-WIN पोर्टलवर किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन करावी. लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.

गर्भाशयक मुखाचा कर्करोग हा एकमेव असा कर्करोग आहे, जो लसीकरणाने टाळता येतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे जिल्हा शल्यक चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी कळविले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos