बल्लारपूर–विसापुरात तलवारींसह दहशत माजवण्याचा प्रयत्न : पोलिसांनी दोन जणांना केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरासह विसापुर परिसरात सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंद केले आहेत. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन तलवारी जप्त केल्या आहेत.
पहिल्या घटनेत, ६ मार्च २०२६ रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अभिषेक प्रभाकर जनगमवार हे सहकारी पोलीस कर्मचारीांसह पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, विसापुर वार्ड क्रमांक ५ येथील शिवा देविदास मोहीतकर (१९) हा रेल्वे स्टेशनजवळील सार्वजनिक रस्त्यावर हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित तरुणाला घेराव घालून पकडले. त्याच्या ताब्यातून सुमारे ५८ सेंमी लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
दरम्यान दुसऱ्या घटनेत, ७ मार्च रोजी रात्री १.३० वाजतापोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना माहिती मिळाली की, झाशी राणी चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर राऊत आटा चक्की, विवेकानंद वॉर्ड जवळ एक तरुण हातात लोखंडी धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित तरुणाला पकडले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव पवन चंदर बानोत (२६), रा. विवेकानंद वार्ड, राउत आटा चक्की जवळ, बल्लारपूर असे सांगितले. त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
दोन्ही आरोपी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार बाळगत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहनलाल निषाद, पंकज शिंदे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं खंडेराव माने, लखन चव्हाण, मिलिंद आत्राम, गुरू शिंदे, वैभव गाडगे, मपोअं अनिता नायडू यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




