नागपूर : बारावीच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र पेपर लीक : दोन विद्यार्थिनींची चौकशी सुरू


- व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरे लीक, शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचे आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरात बारावीच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर लीक होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविल्या, ज्यामुळे परीक्षा प्रक्रिया धक्क्यात आली आहे. सेंट उर्सुला हायस्कूलमधील एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि दोन विद्यार्थिनींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाले पेपर आणि उत्तरे -
सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्सुला हायस्कूलमध्ये बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर चालू असताना एक विद्यार्थिनी प्रसाधनगृहात गेली. १५ मिनिटे ती वर्गात न आल्याने पर्यवेक्षकांना संशय आला.
तिची झडती घेतली असता स्मार्टफोन आढळला, ज्यावर एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर आणि त्याचे उत्तरे लीक झाल्याचे स्पष्ट झाले. त्या ग्रुपमध्ये विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचेही नाव होते. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भौतिकशास्त्राच्या पेपरची माहिती देखील त्या ग्रुपवर आढळली.
शिक्षण मंत्रालयाची कारवाई -
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले की, जर या प्रकरणात कोणीही खासगी कोचिंग क्लासेस, व्यक्ती किंवा विभागीय कर्मचारी सहभागी झाले असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
विभागीय शिक्षण मंडळाची चौकशी -
संबंधित पेपरफुटीमुळे विभागीय शिक्षण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. डॉ. शिवलिंग पटवे, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ यांनी सांगितले की, संशयित विद्यार्थिनीच्या मोबाइलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपवर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचे पेपर आढळले आहेत. याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल.
News - Nagpur




Petrol Price




