महत्वाच्या बातम्या

 नक्षल चळवळीला मोठा धक्का : सर्वोच्च नेता देवजीचे आत्मसमर्पण


- बसवा राजूच्या मृत्यूनंतर महासचिवपदी विराजमान

- आसिफाबाद पोलिसांसमोर १५ हून अधिक सशस्त्र नक्षल्यांसह शरणागती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : देशातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून प्रतिबंधित संघटना CPI (Maoist) चा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी यांनी केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम याच्यासह १५ हून अधिक सशस्त्र नक्षल्यांसमवेत तेलंगणा राज्यातील आसिफाबाद पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे नक्षल चळवळीच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

एप्रिल-मे २०२५ दरम्यान छत्तीसगडमधील करेगुट्टा पहाड परिसरात तब्बल १० हजारांहून अधिक पोलिसांनी व्यापक कारवाई करत नक्षल्यांना घेरले होते. या अभियानात २१ मे रोजी संघटनेचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू ठार झाला. त्यानंतर संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवपदी थिप्परी तिरुपती उर्फ देवजी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बसवा राजूच्या मृत्यूनंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नक्षल्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीचा छत्तीसगड पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना घडली. या सर्व घटनांनंतर देवजी आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.

कोण आहेत देवजी?
तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील कोरुटला गावातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेले ६४ वर्षीय थिप्परी तिरुपती हे ‘माडिगा’ या दलित समुदायातील आहेत. १९८० साली बारावीमध्ये शिक्षण घेत असताना ते करीमनगर येथील विद्यार्थ्यांच्या क्रांतिकारी चळवळीशी जोडले गेले.

१९८३ मध्ये त्यांनी तेव्हाच्या पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केला. प्रारंभी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दलम सदस्य व कमांडर म्हणून काम पाहिले. पुढे ते विभागीय समिती सदस्य झाले. संघटनेतील कार्यक्षमता व संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर दंडकारण्य क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली. बसवा राजू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली होती.

देवजींच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत असून आगामी काळात आणखी काही वरिष्ठ नेते शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos