सडक्या सुपारीच्या अवैध व्यवहारांवर आयकर विभागाची धडक कारवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपुरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शनिवारी पहाटे आयकर विभागाने शहरातील बड्या सुपारी व्यापाऱ्यांच्या साम्राज्याला मोठा दणका दिला. सडक्या सुपारीच्या अवैध व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या इतवारी आणि मस्कासाथ परिसरातील व्यापाऱ्यांवर तसेच त्यांच्याशी संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
करचुकवेगिरी करून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून, तपासादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
करचुकवेगिरी करणारे व्यापारी आयकरच्या रडारवर -
आयकर विभागाच्या मुंबई व नागपूर येथील संयुक्त पथकातील १०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी पहाटे एकाच वेळी विविध ठिकाणी धडक दिली. शांतीनगर येथील राजू अण्णा ऊर्फ राजेश शिनॉय यांच्या निवासस्थानावर तसेच कामठी रोडवरील अल्ताफ, आसिफ आणि गनी कलीवाला यांच्या कार्यालये व गोदामांवर झाडाझडती सुरू करण्यात आली. याशिवाय सुपारीच्या वाहतुकीशी संबंधित काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनाही आयकर विभागाने चौकशीच्या कचाट्यात घेतले आहे.
मुंबई कनेक्शनमुळे कारवाई -
मुंबईतील कुप्रसिद्ध सुपारी व्यापारी फारूखभाई यांच्याशी असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ही व्यापक कारवाई करण्यात आल्याचे समजते. शनिवारी पहाटे कडेकोट बंदोबस्तात आयकर विभागाचे पथक नागपुरात दाखल झाले. कळमना, भंडारा रोडवरील मां उमिया इंडस्ट्रियल एरियातील गोदामे, तसेच इतवारी, मस्कासाथ आणि जागनाथ बुधवारी येथील व्यापाऱ्यांची दुकाने व गोदामांची कसून तपासणी करण्यात आली.
एके-४७ धारी सुरक्षा, डॉग स्कॉड तैनात -
कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता पथकाच्या सुरक्षेसाठी एके-४७ ने सज्ज असलेले सुरक्षा रक्षक आणि डॉग स्कॉडचा ताफा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे छाप्याच्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मोठी बेहिशेबी मालमत्ता उघड होण्याची शक्यता -
शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती असून, ती आणखी दोन दिवस चालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची आणि रोख रकमेची मोजणी सुरू असून, सडक्या सुपारीच्या अवैध व्यवहारातून उभ्या राहिलेल्या काळ्या पैशावर आणि मोठ्या प्रमाणातील करचोरीवर आयकर विभागाचे विशेष लक्ष आहे.
सध्या अधिकृत माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असले तरी, या धाडसत्रातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आणि मोठे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
News - Nagpur




Petrol Price




