विमानात बॉम्ब धमकी : इंडिगोचे विमान लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / दिल्ली : दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक विमानात बॉम्ब आहे अशी धमकी सापडल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. विमानात एकूण २२२ प्रवासी आणि कर्मचारी होते. बॉम्बची धमकी आढळल्यावर विमान तातडीने लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
इंडिगोचे फ्लाइट ६ ई ६६५० हे विमान सकाळी दिल्लीहून बागडोगरासाठी उड्डाण घेतले होते. हवेत असतानाच विमानातील टॉयलेटमध्ये एका कर्मचाऱ्याला हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. टिशू पेपरवर स्पष्टपणे विमानात बॉम्ब आहे असे नमूद होते. ही माहिती मिळताच वैमानिकांनी तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची कल्पना दिली.
सकाळी ८:४६ वाजण्याच्या सुमारास लखनौ विमानतळ प्रशासनाला ही माहिती देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि सकाळी ९:१७ वाजता चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान उतरताच सुरक्षा यंत्रणांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाचा ताबा घेतला.
एसीपी रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. टिशू पेपर कोणी ठेवला, याचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे केला जात आहे. प्राथमिक तपासात विमानाची सखोल तपासणी केली असता अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. तथापि, या घटनेमुळे विमानतळावर हाय अलर्ट लागू करण्यात आला होता.
प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सकडून पर्यायी व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात विमानांना वारंवार अशा खोट्या धमक्यांच्या घटनांमुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
News - World




Petrol Price




