महत्वाच्या बातम्या

 जलसंपदा विभागाचे उप अभियंता त्रिलोक त्रिपाठी सह कंत्राटदारांविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा ८ नुसार गुन्हा दाखल


- पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अमीत रंजन यांना लाच देण्याचा प्रयत्न

विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अमीत रंजन (IAS) यांना लाच देण्याच्या प्रयत्नाखाली जलसंपदा विभागाचे उप अभियंता त्रिलोक जयप्रकाश त्रिपाठी (३५, रा. यवतमाळ) व खाजगी कंत्राटदार कामेश विरन्ना डुल्ला (४०, रा. नागपूर) विरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही संशयित आरोपींना पांढरकवडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल (IPS) करीत आहे. 

पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अमीत रंजन (IAS) हे ८ जानेवारी २०२६ रोजी कार्यालयात असतांना दुपारी १ च्या दरम्यान जलसंपदा विभागाचे उप विभागीय अभियंता त्रिलोक जयप्रकाश त्रिपाठी (यवतमाळ) हे आले. त्यांनी घाटंजी तालुक्यातील कोची - अंबाझरी भूसंपादन प्रकल्पाचा मुद्दा ठेवला. तसेच कंत्राटदाराला वाळुशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने भूसंपादनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे. 

त्यामुळे भूसंपादनाला विलंब लागणार आहे, असे अमीत रंजन यांनी चर्चे दरम्यान सांगितले. या दरम्यान जलसंपदा विभागाचे उप विभागीय अभियंता त्रिलोक त्रिपाठी हे उप विभागीय अधिकारी अमीत रंजन यांना म्हटले की, संबंधित कंत्राटदार आपणाला भेटू इच्छीतो. तेव्हा, उप विभागीय अधिकारी अमीत रंजन म्हणाले की, तुम्ही जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मला भेटायला पाठवा, असे सांगितले. 

तेव्हा, त्रिपाठी हे एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयातून निघून गेले. तथापि, दुपारी ३/३.१५ वाजताच्या सुमारास उप विभागीय अभियंता त्रिलोक त्रिपाठी हे खाजगी अभियंता कामेश डुल्ला यांना सोबत घेऊन पुन्हा कार्यालयात आले. भूसंपादन मुद्यावर उप विभागीय अधिकारी अमीत रंजन यांच्याशी चर्चा सुरू असतांना त्यांना एक पैशाचे पाकीट देण्याचा प्रयत्न झाला. या बाबत अमीत रंजन (IAS) यांनी विचारणा केली असता, सदर पाकीट जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन बन्सोड यांनी तुम्हाला देण्यास सांगितले आहे, असे दोघेही म्हणाले. 

मात्र, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अमीत रंजन यांनी तथाकथित पाकीट न स्विकारता थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात फोन केला. सदरची घटना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या CCTV मध्ये कैद झाला आहे. 

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबीन बन्सल (IPS) हे करीत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos