गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या अतिक्रमणांना रोखण्यासाठी समिती स्थापन


- सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या परिसरातील अतिक्रमणांना रोखण्यासाठी एक महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मंत्रिमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या समितीला गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या परिसरातील अतिक्रमण काढण्याची आणि भविष्यातील अतिक्रमणांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी दिली आहे.
यापूर्वी २० जानेवारी २०२५ रोजी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला होता, पण आता त्याची व्याप्ती वाढवून राज्य संरक्षित स्मारकांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश होईल. त्याचबरोबर, समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश होईल, जे गड-किल्ले आणि स्मारकांच्या संरक्षण व संवर्धन कार्यात प्रगल्भ अनुभव असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांचे प्रतिनिधी असतील.
जिल्हास्तरीय समित्या देखील स्थापण्यात येणार आहेत, ज्यात संबंधित जिल्ह्याच्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण रोखण्याची आणि ते काढून टाकण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांना दिली जाईल. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन व विकास निधीतून उपलब्ध केला जाईल.
हे निर्णय राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धरोहर संरक्षणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
News - Rajy




Petrol Price




