महत्वाच्या बातम्या

 भारत-अफगाणिस्तान जवळीकतेने पाकिस्तान अस्वस्थ : सीमांवर रक्तरंजित संघर्ष,१५ पाकिस्तानी सैनिक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काबूल / इस्लामाबाद : भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या जवळीकतेमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर असतानाच पाकिस्तानने राजधानी काबूलसह सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना अफगाण तालिबानने तीव्र प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मोठा फटका दिला आहे. हेलमंड प्रांतातील कारवाईत किमान १५ पाकिस्तानी सैनिक ठार, तर अनेक चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्याची माहिती समोर आली आहे.

हेलमंडमध्ये पाकिस्तानला मोठा फटका -

हेलमंड प्रांतीय सरकारचे प्रवक्ते मावलावी मोहम्मद कासिम रियाझ यांनी सांगितले की, बहरामपूरमधील डुरंड रेषेजवळ रात्रीच्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तालिबान दलाने पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या असून, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर तालिबानी सैन्याने हेलमंड, कंधार, जाबुल, पक्तिका, पक्तिया, खोस्त, नांगरहार आणि कुनार या सीमावर्ती प्रांतांमध्ये प्रत्युत्तर हल्ले सुरू केले आहेत. या सर्व भागांची सीमा पाकिस्तानशी लागून आहे.

सीमावर्ती प्रांतांमध्ये तीव्र चकमकी -
अफगाण सैन्याने कुनार आणि हेलमंडमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त केली आहे. पक्तिया आणि रब जाजी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण सीमा दलांमध्ये भीषण संघर्ष सुरू झाला आहे. तालिबानी दलांनी पाकिस्तानी सैनिकांकडील शस्त्रे आणि दारूगोळा हिसकावून घेतला असल्याची माहितीही मिळाली आहे.

स्पिना शागा, गिवी, मनी जाभा आणि इतर सीमावर्ती भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानकडून सार्वभौमत्वाचे उल्लंघन – अफगाणिस्तानचा आरोप -

९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिया येथे हवाई हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानने टीटीपी (तेह्रीक-ए-तालिबान पाकिस्तान) प्रमुख नूर अली मेहसूद याला लक्ष्य केले असल्याचा दावा केला आहे. तथापि, तालिबान सरकारने या हल्ल्यांना आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.

भारताच्या दौऱ्यावर असलेले अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी पाकिस्तानला तालिबानच्या संयमाची परीक्षा घेऊ नकाअसे स्पष्ट आवाहन केले. मुत्तकी यांनी भारत-अफगाण संबंध अधिक दृढ करण्याच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विधान विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

पार्श्वभूमी : भारत-अफगाण जवळीक आणि पाकिस्तानची चिड -
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अलीकडच्या काळात राजनैतिक संवाद व आर्थिक सहकार्य वाढले आहे. भारताने काबूलमध्ये मानवी मदत, वैद्यकीय सहाय्य आणि शैक्षणिक प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली असून, तो अफगाण सीमांवर दडपशाहीची भूमिका घेत असल्याचे परराष्ट्र तज्ज्ञांचे मत आहे.





  Print






News - World




Related Photos