महत्वाच्या बातम्या

 समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेची निर्मिती सुरू : देशातील पहिलाच ग्रीन एक्सप्रेसवे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आता केवळ वेगवान प्रवासाचं साधन राहिलेलं नसून, तो देशातील पहिला सौरऊर्जा निर्मिती करणारा एक्सप्रेसवे ठरला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा पुढाकार घेत विदर्भातील दोन ठिकाणी सौर प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील इंटरचेंजवर अनुक्रमे ३ मेगावॅट आणि २ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प सुरू झाले असून, या ऊर्जेचा उपयोग केवळ महसूल उत्पन्नासाठीच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महा समृद्धी नूतन ऊर्जा कंपनीचा पुढाकार -
या प्रकल्पांची उभारणी महा समृद्धी नूतन ऊर्जा कंपनीमार्फत करण्यात आली असून, २०२२ मध्ये झालेल्या करारानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे (MSEDCL) सौर वीज विक्री केली जाणार आहे. यासाठी ३.०५ रुपये प्रति युनिट दर निश्चित करण्यात आला आहे.

महसूल व हरित ऊर्जेचा दुहेरी लाभ -
सौर प्रकल्पांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे टोलशुल्काव्यतिरिक्त महामार्ग व्यवस्थापनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गाची देखभाल अधिक कार्यक्षमपणे होऊ शकेल. त्याचबरोबर, हरित ऊर्जा निर्मितीमुळे कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे.

भविष्यात आणखी प्रकल्प उभारण्याचा मानस -
MSRDC कडून इतर इंटरचेंजवरही अशा सौर प्रकल्पांची उभारणी करण्याचा विचार असून, यामुळे समृद्धी महामार्ग पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा आदर्श बनणार आहे.

सौरऊर्जेचा वापर ही काळाची गरज -
स्वच्छ आणि नवीनीकरणीय ऊर्जा वापरून महामार्ग व्यवस्थापनात आर्थिक व पर्यावरणीय फायदा मिळवण्याचं उदाहरण समृद्धी महामार्गाने उभं केलं आहे. हे पाऊल महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना देशपातळीवर नवा दर्जा देणारे ठरत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos