पाकिस्तानात मुसळधार पावसाचा कहर : ९०० हून अधिक मृत्यू, लाखो नागरिक बेघर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या महापुराने संपूर्ण देशात भीषण परिस्थिती निर्माण केली असून, आतापर्यंत ९०० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पंजाब प्रांतातून २० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर सिंध प्रांतातूनही १.५ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत पूरस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सतलज, चिनाब, रावी या नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, सिंधू नदीसह उपनद्यांची पाणीपातळीही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. देशातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली असल्याने या आपत्तीचा फटका सर्वसामान्य जनतेला अधिकच बसला आहे. घरांची पडझड, शेतीचे नुकसान, जनावरांचे मृत्यू यामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे.
बचावकार्य सुरू, पण अपघाताने वाढते संकट -
पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, नौकादल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्वयंसेवी संस्था मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. नागरिकांबरोबरच जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. मात्र मंगळवारी सिंधू नदीत बचावबोट उलटल्यानं ९ जणांचा मृत्यू झाला. याआधीही जलालपूर पिरवाला येथे अशाच अपघातात ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे लहान बोटींना धोका वाढला आहे.
राहतात तिथेच जीव धोक्यात घालणारे नागरिक -
मालमत्ता, जनावरं आणि शेतीचं रक्षण करण्यासाठी अनेक कुटुंबं अजूनही आपल्या पूरग्रस्त घरांमध्ये राहत असून, त्यांचा जीव धोक्यात आहे. शासनाने वारंवार सूचना देऊनही काही कुटुंबं स्थलांतरास नकार देत आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मदत -
पंजाबमधील पूरग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तातडीने मदत पोहोचवण्यात येत आहे. ब्लँकेट, तंबू, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचे अनेक टन साठे वितरित करण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्रांकडून ४१.५ कोटींची आर्थिक मदत -
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानसाठी ५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४१.५ कोटी रुपये) इतक्या मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने देशात हवामान आणीबाणी जाहीर केली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी ३०० दिवसांचा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
पंतप्रधान शरीफ यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले की, लवकरच देशातील चारही प्रांतांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ठोस रणनीती आखण्यात येईल.
News - World




Petrol Price




