मजुरीच्या वादातून मजुराचा खून : ठेकेदारासह दोघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / गोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सालईटोला मार्गावर मंगळवारी (दि. २) रात्री उशिरा एका मजुराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत करत, मजुरीच्या वादातून ठेकेदारानेच खून केल्याचे निष्पन्न केले आहे.
मृत व्यक्तीची ओळख हनसलाल भंडारी पाचे (३७, रा. रायपूर, ता. जि. गोंदिया) अशी असून, तो कपूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (३९) या ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करीत होता. मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादातून कपूरचंदने मद्यधुंद अवस्थेतील हनसलालसोबत भांडण करून प्रथम मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून त्याचा खून केला, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाच्या आधारे दवनीवाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानीय गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी संयुक्त तपासपथकांची स्थापना केली.
या पथकाने तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे बयान आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन शनिवारी (दि. ६) आरोपी कपूरचंद ठाकरे व ओंकार चेतराम नेवारे (५२, रा. रायपूर) यांना अटक केली. पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहेत.
ही कारवाई केली -
या प्रकरणात कारवाई करणाऱ्या पथकात स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर, संजय टेकाम, पो.उ.नि. वनिता सायकर, शरद सैदाने, महेश राठोड तसेच गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश होता.
News - Gondia




Petrol Price




