महत्वाच्या बातम्या

 पूर्णियात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या : प्रेमसंबंधांच्या संशयातून अमानुष छळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पूर्णिया (बिहार) : बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी भीषण घटना पूर्णियामध्ये उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांच्या संशयातून एका भावाने स्वतःच्या बहिणीवर अमानुष छळ करत तिची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, स्थानिकांत तीव्र संतापाचे वातावरण आहे.

पायाची बोटं चिरडून गोळ्या झाडल्या -

मृत तरुणीचे नाव छोटी कुमारी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भावाला बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यातूनच संतापाच्या भरात त्याने नियोजनबद्ध पद्धतीने हत्या घडवून आणली.

घटनेच्या दिवशी त्याने आधी हातोड्याने बहिणीच्या पायाची बोटं चिरडली. त्यानंतर आधीच घरात लपवून ठेवलेल्या बंदुकीतून तिला गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या छोटील ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मधुबनी बाजारपेठेजवळील घटना -

ही धक्कादायक घटना मधुबनी बाजारपेठेजवळ घडली. मृत मुलीचे वडील सांगतात की, त्यांना छोटी घराच्या दाराशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.धक्कादायक बाब म्हणजे गोळीबाराचा आवाज किंवा बंदुकीचा प्रत्यक्ष धडाका परिसरातील कुणालाही ऐकू आला नाही. त्यामुळे या प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

कुटुंबीयांवरही संशय -
या प्रकरणात कुटुंबीयांवरही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण आणि झालेल्या छळाची अचूक माहिती समोर येईल.

आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू -
हत्या करून आरोपी भाऊ फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकले असून, लवकरच त्याला अटक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

स्थानिकांत संताप -
या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, भाऊ आपल्याच बहिणीसोबत एवढा क्रूरपणे वागेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. प्रेमसंबंधातून घडलेली ही घटना केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठीही लज्जास्पद असल्याची भावना लोकांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - World




Related Photos