चमोलीत मध्यरात्री ढगफुटी : दोन बेपत्ता, घरांचे मोठे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उत्तराखंड : चमोली जिल्ह्यातील थराली तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या आपत्तीत दोन जण बेपत्ता झाले असून, ते ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एसडीआरएफचा चमू दाखल झाला असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे.
जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की, ढगफुटीमुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, अगदी एसडीएम निवासस्थान देखील चार फूट ढिगाऱ्याखाली गेले आहे. एडीएम विवेक प्रकाश यांनीही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनी कळवले की, २० वर्षीय मुलगी व एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, चमोली पोलिसांनी मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्परता दाखवत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून, तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मी परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून असून, सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
News - World




Petrol Price




