तमिळनाडूत टाटा हॅरियर ईव्हीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / तमिळनाडू : नुकतीच बाजारात आलेल्या टाटा हॅरियर इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेनुसार, गाडीच्या समन मोड फीचरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अविनाशी येथे ही घटना घडली. हॅरियर ईव्ही मागे सरकत असताना पीडित व्यक्तीला चिरडले गेले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
नवीन हॅरियर ईव्हीमध्ये समन मोड हा महत्त्वाचा ऑटोनॉमस फीचर असून त्याद्वारे चालक गाडीत न बसता तिला पुढे-मागे हलवू शकतो. मात्र याच फीचरमुळे गाडी अनियंत्रित होऊन जीवितहानी झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. अपघाताच्या वेळी चालक दरवाजा उघडा ठेवून केबिनमध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात गाडी उतारावरून घसरली आणि व्यक्ती खाली पडला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केली; परंतु जड एसयूव्हीच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणावर टाटा मोटर्सने अधिकृत निवेदन जारी करत दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. आमच्या शोकसंवेदना मृतांच्या कुटुंबासोबत आहेत. प्राथमिक माहितीवरून गाडीची मोटार सुरू नसताना ती उतारावरून घसरल्याचे दिसत आहे. वाहन अजूनही कुटुंबाकडे असून आमच्या तज्ञांना त्याची तपासणी करण्याची संधी मिळालेली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले.
News - World




Petrol Price




