गोवंश तस्करीप्रकरणी चार सराईत आरोपी तडीपार


- गोंदिया, भंडारा, गडचिरोली व बालाघाटमधून तीन महिन्यांसाठी हद्दपार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतूक व गोमांस विक्रीत गुंतलेल्या एका सराईत टोळीतील चार आरोपींना वारंवार कारवाईनंतरही सुधारणा न झाल्याने अखेर पोलिसांनी तडीपाराची कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये या चारही आरोपींना गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार झालेल्या आरोपींची नावे अशी -
वसिम नासिर कुरैशी (३४), समीर नासिर कुरैशी (२९), सफिक शरिफ कुरैशी (४५), दानिश सफिक कुरैशी (२२), (सर्व रा. कुंभारटोली, ता. आमगाव) या आरोपींविरोधात आमगाव पोलिस ठाण्यात अवैध गोवंश वाहतूक, गोमांस विक्री व इतर गुन्ह्यांप्रकरणी एकूण १० गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी गोमांस जप्त करण्यात आले असून, समाजासाठी ते गंभीर धोका ठरत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या टोळीविरुद्ध अनेकदा छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपींनी गुन्हेगारी थांबवण्याऐवजी पुन्हा पुन्हा तीच कृती सुरू ठेवली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी तडीपार करण्याचा निर्णय घेतला.
तडीपार कारवाईत पोलिसांचे योगदान -
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर, तसेच आमगाव गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार दुधराम मेश्राम, असिम मन्यार, विनोद उपराडे, शिपाई चेतन शेंडे, नितीन चोपकर, दिनेश वानखडे, भागवत कोडापे, मिलनसिंह मंजुटे, महिला पोलिस हवालदार यशोदा भोयर आणि विनिशा बहेकार यांनी केली आहे.
News - Gondia




Petrol Price




