भजनाच्या कार्यक्रमाला सोबत नेण्यास नकार दिल्याचा राग : तरुणावर चाकूहल्ला, वडीलही जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भजनाच्या कार्यक्रमाला सोबत नेत नसल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री बाबुपेठ परिसरातील शितला माता मंदिराजवळ घडली. या हल्ल्यात मुलाला वाचविण्यासाठी धावलेले त्याचे वडीलही चाकूच्या वाराने जखमी झाले.
रविंद्र ऊर्फ अन्नू नारायण मांढरे रा. ढीवर मोहल्ला, बाबुपेठ, चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून, नितीन रामभाऊ मांढरे असे जखमी तरुणाचे नाव आहे. नितीन हा घरगुती भजनाचे कार्यक्रम करण्याचे काम करतो. आरोपी रविंद्र हा पूर्वी त्याच्यासोबत भजनाच्या कार्यक्रमांना जात होता. मात्र, तो दारू पिऊन कार्यक्रमात गैरवर्तन करीत असल्याने नितीनने त्याला यापुढे कार्यक्रमाला येऊ नको, असे सांगितले होते. तेव्हापासून आरोपीच्या मनात राग होता.
२५ नोव्हेंबर रोजी नितीन हा विठ्ठल मंदिर वॉर्डातील एका भजनाच्या कार्यक्रमाला जाऊन रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतला. रात्री पावणे दहाच्या सुमारास रविंद्र हा त्याच्या घराजवळ आला आणि मला सोबत नेत नाही, एकटेच किती पैसे कमवता ते कमवा, असे म्हणत आरडाओरड करू लागला. यावेळी नितीन आणि त्याचे वडील रामभाऊ मांढरे घराबाहेर आले.
नितीनने त्याला शिवीगाळ का करतोस, तू दारूच्या नशेत आहेस, उद्या या विषयावर बोलू, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या रविंद्रने हातातील चाकूने नितीनच्या उजव्या पोटाच्या कुशीवर आणि डाव्या बाजूला वार केले. मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या रामभाऊ मांढरे यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या मधोमधही चाकूचा वार लागला.
या हल्ल्यात नितीन गंभीर जखमी झाल्याने त्याची पत्नी योगिता मांढरे आणि भाचा आकाश नागपुरे यांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी रामभाऊ मांढरे यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




