चंद्रपुरात एलसीबीची मोठी कारवाई : ५७ गोवंशीय जनावरांची क्रूर वाहतुकीतून सुटका, ९ जनावरांचा मृत्यू; ३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशीय जनावरांची अत्यंत अमानुषपणे आणि क्रूरतेने वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरने मोठी कारवाई केली. चंद्रपूर - मुल मार्गावरील अजयपूर परिसरात १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून कोंबून नेण्यात येत असलेल्या ५७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. मात्र, या क्रूर वाहतुकीत ९ जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या कारवाईत पोलिसांनी ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.
२१ नोव्हेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजयपूर परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित १८ चाकी ट्रेलर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ५७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून नेली जात असल्याचे आढळले. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांना आखूड दोराने बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात होती. या निर्दयी वाहतुकीमुळे ९ जनावरांचा मृत्यू झाला, तर उर्वरित ४८ जनावरांची पोलिसांनी सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना तातडीने उपचार, चारा-पाणी आणि देखभालीसाठी प्यार फाउंडेशन, पडोली येथे दाखल करण्यात आले.
या प्रकरणात नईमुद्दीन करिमद्दीन शेख ४० वर्ष, रा. घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली आहे. तर इम्रान शेख, इर्शाद खान आणि मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर तिघेही रा. मूर्तिजापूर, जि. अकोला हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३० लाख रुपये किमतीचा ट्रेलर ट्रक, ५ लाख ७० हजार रुपये किमतीची ५७ गोवंशीय जनावरे आणि १० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारित २०१५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरी उपविभाग पथकाने केली.




Petrol Price




