डिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री


- डिझेल चार रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.   सरकारने हालचाली सुरु केल्या असून डिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले.
‘इंधनांच्या दराबाबत सरकार काहीच करु शकत नाही’, हा पवित्रा धारण केलेल्या केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करआकारणीत कपात केली. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रति लिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर एक रुपयांचा बोजा तेल कंपन्या उचलणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही करात कपात केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर एकूण पाच रुपयांनी कमी झाले. मात्र, राज्य सरकारने डिझेलवरील करात कोणतीही कपात केली नव्हती.  त्यामुळे राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनीच कमी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी नाशिकमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी डिझेलच्या दरातही कपात करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी केले. यापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलवरील करात कपात केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल एकूण पाच रुपयांनी स्वस्त झाले. आता डिझेलचे दरही आणखी दीड रुपयांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण चार रुपयांनी स्वस्त होईल. रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.    Print


News - Rajy | Posted : 2018-10-05


Related Photos