आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साधणार जिल्ह्यातील आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी व सदस्यांशी थेट संवाद : आरोग्य सेवांचा घेणार आढावा


- आरोग्य संवाद यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यात दाखल होणार; ग्रामीण भागातील आरोग्य समस्या, सुविधा व अडचणींवर होणार चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी बनविण्याच्या उद्देशाने आज, १९ नोव्हेंबर रोजी आरोग्य संवाद यात्रा वर्ध्यात दाखल होत आहे. यादरम्यान राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर सायंकाळी ६:१५ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
या आरोग्य संवाद कार्यक्रमात एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती, क्षयरोग नियंत्रण समिती, जन आरोग्य समिती तसेच ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांसारख्या सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संबंधित घटकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थेत उपस्थित राहून या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संवादाच्या माध्यमातून शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा करणे, समित्यांची भूमिका स्पष्ट करणे आणि लोकसहभागाच्या जोरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार यांनी केले आहे.




Petrol Price




