बल्लारपुरात घरातच आढळला ५७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह : दोन ते तीन दिवसांपासून होते घरात एकटेच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील गोकुळनगर वार्डातील कला मंदिर परिसरात एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरातील खाटेवर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रकाश शंकर कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मागील सुमारे २६ वर्षांपासून कुटुंबापासून वेगळे कला मंदिर परिसरात एकटेच राहत होते. मृतदेहाची अवस्था पाहता त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मृताचे पुत्र प्रविण कांबळे यांना त्यांचा मित्र समीर नाईक याचा फोन आला. त्याने प्रकाश कांबळे हे कला मंदिर, गोकुळनगर वार्ड येथील राहत्या घरी मृतावस्थेत पडून असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रविण कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वडील घरातील पहिल्या खोलीत खाटेवर उताण्या अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या शरीरावर किडे पडले होते, तसेच घरातून तीव्र दुर्गंधी येत होती.
याबाबत परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, प्रकाश कांबळे हे मागील दोन ते तीन दिवसांपासून घराबाहेर दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले. घराचा दरवाजा केवळ टेकविलेल्या अवस्थेत होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी दरवाजा उघडून पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश वाघमारे आणि पोलीस अंमलदार अंकुश बुरांडे यांनी केला. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.




Petrol Price




