महत्वाच्या बातम्या

 पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- शिर्डी विमानतळ परिसरात आलिशान हॉटेलची उभारणी; ताज समूह आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीदरम्यान सामंजस्य करार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या पर्यटन विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. शिर्डी विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलची उभारणी करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे शिर्डी येथे येणाऱ्या देश-विदेशातील साईभक्तांसह विमान प्रवाशांना जागतिक दर्जाच्या निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार असून, पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिर्डी हे देशातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ असून, श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देशाच्या विविध भागांसह परदेशातूनही लाखो भाविक येथे येतात. शिर्डी विमानतळामुळे या भागाची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली असून, विमानतळ परिसरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि आदरातिथ्य सेवा विकसित करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेलची उभारणी हा शिर्डीच्या पर्यटन विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

ताज समूहासारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे या परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल. या प्रकल्पामुळे केवळ पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राचाच विस्तार होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच रोजगारनिर्मितीच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी टाटा समूह आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनासोबतच परिसरातील व्यावसायिक आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे विमानतळ विकासाची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर तसेच दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात ताज समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिर्डी विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलची उभारणी झाल्यानंतर साईभक्तांना आधुनिक आणि दर्जेदार निवास सुविधा मिळण्याबरोबरच शिर्डीला धार्मिक पर्यटनासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन व आदरातिथ्य केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.





  Print






Related Photos