महत्वाच्या बातम्या

 सीटीपीएसमधील लोखंडी साहित्य चोरीचा एलसीबी ने केला पर्दाफाश : सहा जण जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : थर्मल पॉवर स्टेशन (सीटीपीएस) दुर्गापूर येथून सुमारे ६०० किलो लोखंडी साहित्य चोरी झाल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील सहा आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे साहित्य हस्तगत केले आहे.

या प्रकरणात आरोपी दुर्गाप्रसाद दुकालु यादव ४० वर्षे रा. सुमित्रानगर, चंद्रपूर, संजय जोहरी ठाकूर ३१ वर्षे नारद भगवानसिंग निशाद ४० वर्षे नजीर उस्मान शेख ३९ वर्षे शेख अहमद शेख हसन ४० वर्षे आणि शेख इम्रान शेख बिस्मीलाह ३६ वर्षे रा. तुकूम, चंद्रपूर, भंगार दुकानदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुर्गापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतला.

या कारवाईत १५ नग लोखंडी बिटर आर्म हँगर असेंब्ली असा एकूण अंदाजे ६०० किलो वजनाचा लोखंडी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या साहित्याची अंदाजे किंमत १२ हजार रुपये आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग चंद्रपूर पथकाने केली.





  Print






Related Photos