अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रबोधन शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : समाजातील वाढती अंधश्रद्धा, जातीवाद आणि धर्मांध उन्माद दूर करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह पी. एम. जाधव यांनी उपस्थित महिला व पुरुष सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्पविज्ञान आणि चमत्कारामागील विज्ञान या विषयावर जाधव यांनी प्रबोधनात्मक सादरीकरण केले. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातही सध्या भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशोक खरात प्रकरणातील भोंदूगिरीचा पर्दाफाश केल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आतापर्यंत शंभरहून अधिक भोंदूबाबांचा पर्दाफाश केल्याचे त्यांनी सांगितले.
भोंदूबाबांकडून तथाकथित चमत्कार दाखवून दैवी शक्ती, मंत्रशक्ती किंवा अद्भुत शक्तीच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जाते. गुप्तधन शोधणे, विषारी सापाचे विष उतरविणे, विविध आजार व समस्यांचे निराकरण करण्याची खोटी आश्वासने देऊन विशेषतः महिलांचे शोषण केले जाते. अशा फसव्या दाव्यांना महिलांनी बळी पडू नये, यासाठी त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार विकसित करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी विज्ञान, गणित आणि हातचलाखीच्या माध्यमातून भोंदूबाबांकडून सादर केल्या जाणाऱ्या चमत्कारांचे प्रात्यक्षिक दाखविले.
पाण्याने दिवा पेटविणे, रिकाम्या कलशातून तीर्थ काढणे, हवेत हातवारे करून साखळी काढणे तसेच जळता कापूर हातावर खेळवून तोंडात टाकणे यांसारख्या प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली. त्यामुळे चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी ओळखावी, याबाबत उपस्थितांमध्ये जागृती निर्माण झाली. या कार्यक्रमाला कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे, कॉम्रेड राजेश पिंजरकर आणि कॉम्रेड अरुण भेलके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कॉम्रेड दहिवडे आणि कॉम्रेड पिंजरकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड अरुण भेलके यांनी केले.




Petrol Price




