महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बल्लारपुरात सर्वधर्म प्रार्थना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहर महिला काँग्रेस कमिटी, बल्लारपूरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध धर्मांच्या प्रार्थनांच्या माध्यमातून एकता, बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, बल्लारपूरच्या नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अफसाना सय्यद, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले तसेच बबीता मोटिवेशन ग्रुपच्या बबीता बहुरिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने समाजाला परिवर्तनाची दिशा दिली, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचे स्मरण करत समाजात जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन एकोपा निर्माण करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
सर्वधर्म प्रार्थनेमुळे कार्यक्रमाला सामाजिक एकात्मतेचे स्वरूप प्राप्त झाले. विविध धर्मांच्या प्रार्थनांमधून मानवता, शांतता आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात आला. उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ममता चंदेल, संगीता तावाडे, परिणीता गायगोले, कीर्ती चावडा, किरण बेलखेंडे, नीतू तिवारी, मीनाक्षी गलगट, नीता नागदेवते, मीना बहूरिया, बबीता बाजपेयी आणि सोनू निखार यांनी सहकार्य केले. उपस्थितांच्या सहभागामुळे सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




Petrol Price




