शाश्वत आणि सर्वांगीण विकासातून महान गडचिरोली घडविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- बोदली येथे लॉयड्स कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण; अडीच हजार नियुक्तिपत्रांचे प्रातिनिधिक वितरण, स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे शोषण नव्हे, तर उपलब्ध नैसर्गिक संपत्तीचे योग्य दोहन करून शाश्वत विकास साधणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. उद्योग, रोजगार, शिक्षण आणि पर्यावरण यांचा समतोल राखत या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून भविष्यात महान गडचिरोली घडवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लॉयड्स अँड मेटल एनर्जी लिमिटेडच्या वतीने बोदली येथे उभारण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण रविवारी (१५ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लॉयड्स कंपनीने गडचिरोली परिसरात सुरू केलेले विकासकाम हे केवळ नफाकेंद्रित नसून माणूसकेंद्रित आहे. समाजाला सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास साधला जातो, तेव्हा समाजाचे आशीर्वाद हेच खरे सामाजिक भांडवल ठरते. लॉयड्सच्या माध्यमातून गडचिरोलीत हे काम होत आहे. एकेकाळी नक्षलवादी चळवळीत असलेले काही युवक आज कौशल्य प्रशिक्षण घेऊन उद्योगांमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. विविध उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ या प्रशिक्षण केंद्रातून तयार होत आहे.
पाच वर्षांपूर्वी गडचिरोलीत येण्यास लोक घाबरत होते. मात्र, आज येथील तरुणी परदेशात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. हा गडचिरोलीत घडत असलेल्या परिवर्तनाचा मोठा पुरावा आहे. उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून जिल्ह्याची ओळख बदलत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य -
औद्योगिक विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्योगांसाठी काही प्रमाणात वृक्षतोड करावी लागली, तरी वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन झालेच पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात पाच कोटी झाडे लावण्याचा संकल्प शासनाने केला असून त्यापैकी आतापर्यंत एक कोटी झाडे लावण्यात आली आहेत. यापुढेही हरित गडचिरोली अधिक हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
अडीच हजार नियुक्तिपत्रांचे वितरण -
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडीच हजार नियुक्तिपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. लॉयड्सचे प्रबंध संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविकातून कौशल्य प्रशिक्षण केंद्राची संकल्पना आणि उद्दिष्टांची माहिती दिली.
यावेळी अॅडव्हान्स मिनरल प्रोसेसिंग वर्कशॉप, लॉयड्स सेंट्रल किचन आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल या उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा -
गडचिरोलीतील स्थानिक युवक आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम व स्वावलंबी बनविणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रात विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामध्ये वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, सोलर तंत्रज्ञान, प्लंबिंग, एमईपी आणि दुचाकी वाहन दुरुस्ती यांसारख्या तांत्रिक व अभियांत्रिकी कौशल्यांचा समावेश आहे. बांधकाम, गवंडीकाम, बार बेंडिंग आणि सुरक्षा रक्षक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच हलकी व जड वाहने चालविणे, वेअरहाउस असोसिएट आणि सप्लाय चेन व्यवस्थापन यांसारख्या लॉजिस्टिक्सविषयक अभ्यासक्रमांची सुविधा आहे.
हॉटेल मॅनेजमेंट, पाककला, फूड अँड बेव्हरेज, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, पर्यटन आणि मूलभूत डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षणही येथे मिळणार आहे. याशिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार नामदेव किरपान, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौशल्य विकास, औद्योगिक प्रगती, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालून गडचिरोलीला विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.




Petrol Price




