साकोली वनपरिक्षेत्रात दोन वाघांचा वावर : करांडला परिसरात बिबट्याची दहशत

- जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण; धान कापणीच्या हंगामात शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / साकोली : साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत उमरी आणि सानगडी सहवनक्षेत्रात दोन पट्टेदार वाघांचा वावर आढळून आल्याने जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये दोन्ही वाघांची छायाचित्रे टिपली गेल्याने त्यांच्या अस्तित्वाला दुजोरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, या वाघांनी पाळीव जनावरांची शिकार केल्याची माहिती समोर आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. त्यातच करांडला परिसरातही बिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उमरी सहवनक्षेत्रातील महालगाव परिसरात नर वाघाचा, तर सानगडी सहवनक्षेत्रातील पापडा, कैसलवाडा आणि सिरेगाव बिटात मादी वाघिणीचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पळसगाव, नैनपूर, सालई, झाडगाव तसेच गोंदिया जिल्ह्यातील भिवखिडकी गावालगतच्या जंगलातही वाघांच्या हालचाली आढळल्याची माहिती आहे. हे दोन्ही वाघ नवेगावबांधलगतच्या बोदराई अभयारण्यातून या परिसरात आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही वाघांनी पाळीव जनावरांवर हल्ले करून शिकार केल्याची माहिती असल्याने जंगलालगतच्या गावांतील पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे.
करांडला परिसरात बिबट्याचा संचार -
दोनाड येथे आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच करांडला परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरा मशीनमागील रस्ता ओलांडताना राईस मिल, दोनाड येथील एका हमाल मजुराला बिबट्या दिसला. त्यानंतर स्मशानभूमी परिसरात शेतकऱ्यांनाही त्याचे दर्शन झाले. एक-दोन दिवसांपूर्वी डोकेसरांडी शिवारातही बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बिबट्या नाल्यालगतच्या झुडपांमध्ये लपून बसण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
धान कापणीच्या हंगामात धोका वाढला -
सध्या धान कापणी, मळणी आणि रब्बी पिकांच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे जंगलालगतच्या शेतांमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि महिला मजुरांची दिवसभर वर्दळ असते. अशा परिस्थितीत वाघ आणि बिबट्यांचा संचार शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे, दिवाळीनंतर ग्रामीण भागात मंडई आणि विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल वाढणार असल्याने रात्रीच्या वेळीही ग्रामीण रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ राहणार आहे. आधीच या भागात बिबट्या, अस्वल आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर असताना दोन वाघांची भर पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी -
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने दोन्ही वाघांसह बिबट्याच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवावे, जंगलालगतच्या गावांमध्ये गस्त वाढवावी, नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे. तसेच करांडला परिसरातील बिबट्याचा माग काढून त्याला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




