वर्धा जिल्ह्यातील ४४ हजार १५१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४४१ कोटींची कर्जमाफी जमा

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; १३ हजार ५७७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार १५१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ४४१ कोटी ८६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी शासनाकडून आणखी १२ हजार ६२ शेतकऱ्यांच्या खात्यांत १२९ कोटी ७५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील एकूण ७२ हजार ७१० शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ६० हजार ८३० शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पात्र म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहेत. मात्र, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी १३ हजार ५७७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.
कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, सहायक निबंधक कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ही यादी संबंधित तलाठ्यांकडेही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर संदेश प्राप्त झाला आहे, त्यांनी आपले आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सामाईक सुविधा केंद्रात (सीएससी) जाऊन ई-केवायसी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि कर्जमाफीसाठी मंजूर झालेल्या रकमेची वैधता तपासण्यात येणार आहे. सीएससी केंद्रावर प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांनी त्यांचा विशिष्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
दरम्यान, ज्या पात्र शेतकऱ्यांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेत जाऊन मृत्यूची नोंद करावी आणि बँकेच्या नियमानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी. मृत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणातील अमान्यतेची माहिती जिल्हास्तरीय समितीकडे (डीएलसी) पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व ई-सेवा केंद्र चालकांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनामूल्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या परंतु अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




