थकीत प्रोत्साहन रकमेसाठी ३२ आशा स्वयंसेविकांचे बेमुदत धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोविड-१९ महामारीच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांना अद्याप त्यांच्या हक्काची प्रोत्साहन रक्कम मिळालेली नाही. तब्बल पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी आजपासून घुग्घुस येथील आठवडी बाजार रंगमंचावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कोविड महामारीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्यविषयक जनजागृती, माहिती संकलन तसेच आरोग्य विभागाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत पार पाडल्या. या कामाच्या मोबदल्यात दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे २४ महिन्यांची प्रोत्साहन रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन महिन्यांची रक्कम मिळाली असून उर्वरित २२ महिन्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचे आशा स्वयंसेविकांचे म्हणणे आहे.
या मागणीसाठी संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली होती. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी १५ दिवसांची, तर २७ ऑक्टोबर रोजी सात दिवसांची मुदत देऊन मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने अखेर आशा स्वयंसेविकांनी बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
कोविड काळातील थकीत २२ महिन्यांची प्रोत्साहन रक्कम तातडीने अदा करावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आशा स्वयंसेविकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विदर्भ सचिव सुरेश पाईकराव, आझाद समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव रिता फकरू देशकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत. मागण्यांबाबत प्रशासनाकडून लेखी व ठोस निर्णय मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




Petrol Price




